Thursday, 3 January 2013


कुणी कोडे माझे उकलील का

कुणी कोडे माझे उकलील का ?
 कुणी शास्त्री रहस्य कळवील का ?

हृदयी तुझ्या सखी, दीप पाजळे,
 प्रभा मुखावरी माझ्या उजळे
 नव रत्ने तू तुज भूषविले,
 मन्मन खुलले आतील का ?

गुलाब माझ्या हृदयी फुलला
रंग तुझ्या गालावर खुलला,
काटा माझ्या पायी रुतला,
शूल  तुझ्या उरी कोमल का ?

माझ्या शिरी धग निळा डवरला,
तुझ्या नयनी  पाऊस खळखळला,
शरचंद्र या हृदयी उगवला,
प्रभा तुझ्या उरी शीतल का ?

मद्याचा मी प्यालो प्याला,
प्रिये, तयाचा मद तुज आला;
कुणी जखडीले दोन जीवांला
मंत्रबंधनी केवळ ? का
                                                    _ भा. रा. तांबे 

No comments: